Marathi

एक क्षण (Ek kshan)

एक क्षण (Ek kshan)

दुपारची दीड-दोनची वेळ, थंडीचे दिवस असल्याने लवकर जेवण आटपून गरम रजईत पहुडलेली मी आणि माझ्या बाजूला मऊ ब्लँकेटमध्ये शांत झोपलेली ती. मी तिच्याकडे पाठमोरीच झोपले होते. अचानक तिच्या रडण्याचा आवाज आला आणि मी खाड्कन जागी झाले. वळून बघितलं तिच्याकडे तर रडणं बंद, आणि गोंडस स्मित हास्य करत ती माझ्याकडे बघत होती.

हाच तो क्षण का ज्यासाठी इतका त्रास सहन केला. डोळे भरून टिपून घेतला तिचा चेहरा, तिच्या डोळ्यातले निरागस भाव आणि ओठांवरचे हसू. मनाची शांतता होती त्या क्षणांत. Special Bond म्हणतात तो हाच का?

ती म्हणजे माझी ४ महिन्यांची पृथा, माझी चिमुकली. ती झाली तेव्हा अगदी लाल मासाचा गोळाच जणू. पहिलटकरीण असल्यामुळे मला तिला घेताही येईना, लाड करणे तर दूरच. सुरुवातीचे ५–६ दिवस हॉस्पिटलमध्ये सतत हाताला सलाईन होते, त्यामुळे फक्त दूध पिण्यासाठी ती माझ्या जवळ यायची. बाकी वेळ ती बाबांकडे किंवा आजी-आजोबांकडे असायची.

तेव्हा मला वाटायचं की मी जगातली सर्वात मूर्ख आई आहे. माझं आणि तिचं काही जुळत नाहीये, आमचं कधी बॉन्डिंग होणारच नाही. इतका त्रास सहन केला तो कशासाठी? हे आपल्याच सोबत होतंय का? मलाच नेमक काही जमत नाहीये असं वाटायचं. कमीपणा वाटायला लागला होता. चूक तर नाही ना केली बाळाला जन्म देऊन? आपण तिला आपलं प्रेम देऊ शकू की नाही? असे अनेक नकारात्मक विचार मनात डोकवायचे.

पण आज एका क्षणात माझं विश्व बदललं. आयुष्याला सकारात्मक दृष्टीकोण आलाय. जीवन जगावंसं वाटतंय अगदी मनसोक्तपणे. बाळ झालं की बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने करता येत नाहीत, पण खंत कुठेच नाही. नाही मिळत मैत्रिणीसोबत मॉलमध्ये जायला, नाही जाऊ शकत नवीन सिनेमाला, नाही मिळत जोडीदारासोबत आरामात बसून चहा प्यायला वेळ. पण काहीच हरकत नाही. त्याच्या आणि माझ्यामध्ये हि छोटीशी कॉफी खळखळून हसतेय ना , त्यातच सगळं जग सामावलंय.

आता खऱ्या अर्थाने आईपण अनुभवतेय. हा प्रसूतीनंतरचा ३–४ महिन्यांचा काळ बरंच काही शिकवून गेला. गरोदरपणात असंख्य सूचनांचा पाऊस पडत असतो,सल्ल्याचे घडे भरतात, हे कर ते कर, असं कर तास कर . प्रसूतीनंतरही बरंच काही सांगितलं जातं—बाळाला कुशीत घेण्यापासून ते झोपवणे, अंघोळ घालणे,पथ्य पाळण्याबाबत सक्त ताकीद दिली जाते,अगदी न विसरता सगळे शिकवत असतात. पण हा सुरुवातीचा मनातला गोंधळ त्या नुक्त्या झालेल्या आईलाच शांत करायचा असतो . आईपण सांगून, शिकवून, सूचना पाळून येतच नाही. आपल्यातली आई आपल्यालाच शोधावी लागते.

आणि आपली साथ देणारं त्या वेळी दुसरं कोणी नसून आपल्याला आई बनवणारं तो गोंडस जीव असतो. फक्त थोडी वाट बघावी लागते, थोडा संयम ठेवावा लागतो. तो क्षण येतोच कधीतरी प्रत्येक आईच्या आयुष्यात.

Leave a Thought