Marathi

ईराचा छोटासा लढा (Ira cha chhotasa ladha)

ईराचा छोटासा लढा (Ira cha chhotasa ladha)

मी लहान असताना एका नाटकात काम केलेलं, त्याचं नाव होतं “स्त्री तुझी वैरीणी तुच”. त्या शीर्षकाचा आणि नाटकाचा ही माझ्या विचारांवर थोडा परिणाम झाला. खरोखरच स्त्री ही स्त्रीची वैरीण आहे का, विचार करायला लागले. अनेक घरात सासू-सुनेचं पटत नाही, कुठे शेजारी स्त्रियांचे वाद होत असतात तर कुठे नोकरीत स्त्रीच स्त्रीला मागे ओढत असते. पण मग काय, पुरुषांच्या बाबतीत हे होत नाही का? त्यांचंही एकमेकांशी पटतच असं नाही. माझ्या मते स्त्रियांच्या वादाचा गोंगाट जास्त होतो. जसजशी मी मोठी झाले, माझं मत एकच झालं की विचारांचं विचारांशी पटत नाही, आणि अशात स्त्री जास्त बोलकी असल्यामुळे तिचे वाद दिसून येतात.

काही वेळेला मात्र याउलट बघायला मिळतं. स्त्री अडचणीत असेल किंवा तिच्या स्थानाला धक्का पोहोचणार असेल तर तिला तारून नेणारी स्त्रीच असते. हे बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत घडलंही असेल. कधी शेजारीण तर कधी सखी मदतीला धावून येते, तर कधी ओळख नसताना परकी स्त्री मदत करते. असंच काहीसं ईराच्या आयुष्यात घडलं.

ईरा एक उच्च आयटी कंपनीमध्ये गेली कित्येक वर्षं नोकरी करतेय. ती खंबीर स्त्री, घर, कुटुंब, मातृत्व अशा अनेक विभागात तडजोडी करत आपली स्वतःची ओळख जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतेय. आयुष्यात बरेच उतार-चढाव पचवले आहेत तिने, पण तिला कधी स्त्रीत्वाने खचवले नाही. अशी ही खंबीर ईरा, आज थोडी रडवेली झाली होती. कधी कधी आपली काहीच चूक नसताना केवळ “ती” आहे म्हणून काही नावडत्या गोष्टींचा सामना करावा लागतो.

ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये गरम चहाच्या वाफांचा पाऊस जणू तिच्या डोळ्यांमध्ये गदगद करत होता. तेवढ्यात अंगद तिच्या दिशेने येताना दिसला आणि तिने डोळे कोरडे केले. अंगद म्हणजे ईराचा सहकारी, उंचपुरा, पहलवानासारखी अंगकाठी, हातावर टॅटू असलेला पण मनाने एकदम चांगला. ईरा आणि अंगदची मैत्री एका ट्रेनिंग प्रोग्रामदरम्यान झाली आणि तेव्हापासून दोघेही कामाच्या गोष्टी शेअर करू लागले.

ईराच्या प्रोजेक्टमध्ये तिच्या पेक्षा कमी अनुभव असलेला सुबोध मॅनेजर म्हणून नेमला गेला. फुशारकी मारणारा पण स्त्रीविरोधी विचारांचा. ईराने अनेक मिटिंगमध्ये विरोध केला पण फारसा फरक पडला नाही. शेवटी तिच्या मेहनतीचं श्रेय सुबोधकडे गेलं. यामुळे ईरा खूप खचली. अंगदने तिच्या बाजूने बोलायचा प्रयत्न केला पण ऑफिसमध्ये अफवा पसरल्या आणि दोघांचं नाव जोडून गप्पा सुरू झाल्या.

ईराने हार मानली नाही. तिने ठरवलं की स्वीकारामध्येच ताकद आहे. काही गोष्टी पटल्या नाहीत तरी स्वीकार करणं हेच भलं. तिने सुट्टी घेतली, कुटुंबासोबत वेळ घालवला आणि मन शांत केलं.

पुन्हा ऑफिसमध्ये परतल्यावर प्रोजेक्टच्या क्लायंट कॅथीने ईराची खरी क्षमता ओळखली. सुबोधच्या अपयशामुळे ईराला पुढे येऊन काम करावं लागलं. कॅथीने मुद्दाम ईराला संधी दिली आणि शेवटी प्रोजेक्ट तिच्या हातात आला.

फायनल डेमोच्या वेळी ईराच्या डोळ्यांत आत्मविश्वास चमकत होता. तिच्या चेहऱ्यावर छोटासा लढा जिंकण्याचा आनंद दिसत होता. कॅथीने तिच्याकडे हसून पाहिलं, जणू काही दोघींनी एकत्र विजय साजरा केला.


Leave a Thought