Marathi

मला वेळ हवाय (Mala vel haway)

मला वेळ हवाय (Mala vel haway)

अगं आई मी जाते आता स्वतः , तू येऊ नकोस. तीचे इतके आत्मविश्वासपूर्ण बोलणे ऐकून कौतुकाने हसू आले पण अचानक काळजाचा ठोका चुकला. थोडा वेळ स्तब्ध होऊन तिने बंद केलेल्या दाराकडे काळजीने बघत होते, तेवढ्यात दार उघडून ती बाहेर आली. माझ्या चेहऱ्यावरचे भाव तिला कळले असावे, लगेच ती मला म्हणाली: “अगं काळजी करू नको, मला येतो आता शाळेत. पण मी स्वतः जाते तेव्हा दार लावून जाते.”

आई म्हटलं की गभीर भावना कुठेही वाहायला लागतात मग एखाद्या मोठ्या मॉलच्या बाथरूममध्ये असो वा घरात. माझ्या पाणावलेल्या डोळ्यांकडे बघत ती म्हणाली: “किती काळजी करतेस. मी करते सगळं बरोबर.”

मी लगेच तिचा गोड पापा घेत म्हणाले: “किती मोठी झालीस गं माझी मुलगी.”

पण मन थोडं सैरभैर झालं होतं. ही खरंतर एक साधी गोष्ट होती—ती तं स्वतः वॉशरूमला जाते आणि तेही कडी लावते. व्यवस्थित सगळं करते. तिला आता माझी मदत लागत नाही. काही दिवसांपूर्वी जेव्हा सुट्टी आली होती तेव्हा ती आई-आई हाक मारायची. तेव्हा मीच तिला म्हणायची: “किती दिवस आई-आई करणार आहेस, हे तं स्वतः करायला शिक.” आणि आता ती हे सगळं यशस्वीपणे करतेय तर मी का इतकी अस्वस्थ झाली आहे?

खरंच काही गोष्टी, काही क्षण कसे हाताळायचे हे खूप कठीण पडतं. मुलं मोठी होताना बघणं हा जीवनाचा अविभाज्य टप्पा आहे. सगळ्या संवेदनांचा मेळ होतो तिथे. कधी नको वाटतं तर कधी वाटतं की तिथेच थांबून जावं.

मुलगी असणं म्हणजे अजूनच गंमत. जीव इतका गुंतला असतो की पावलोपावली तिच्या मोठं होण्याची जाणीव होते. आजही तिचा तो छोटासा जीव पोटातून माझ्या हातात आलेला अगदी जसाच्या तसा आठवतो. तेव्हा तीची आई नजरेआड झाली की रडायची, आणि आता तं स्वतः सगळं करतेय. किती पटकन जातात दिवस.

तिचं बालपण मनसोक्त मनात भरते न भरते ती ग तेव्हा सीमेवर पोचलीसुद्धा. पूर्वी मला कुठे मैत्रिणींसोबत जायचं ठरलं की ती राहणार नाही म्हणून कितीतरी योजना रद्द कराव्या लागायच्या. पण आता मात्र ती तं स्वतःच मला म्हणते: “तुला जायचं तर जा, मी राहू शकते.”

असे अनेक क्षण येतात तेव्हा सुचत नाही कसे वागावे. तिला कसे समजावे की हे एक ना एक दिवस होणारच आहे. ती आज ना उद्या पूर्णपणे स्वावलंबी होईल, स्वतंत्र होईल, स्वतःचं विश्व बनवेल. त्या विचारांनी डोळे भरून येतात. मी या सगळ्यासाठी अजून तयार नाही. मला वेळ हवा आहे तिच्यासोबत.

Leave a Thought