Marathi

माझा गुरु (Maza Guru)

माझा गुरु (Maza Guru)

नुकतंच एक गाणं “मेरी प्यारी अम्मी” टीव्हीवर येतंय. गाणं अतिशय सुंदर आहे यात वादच नाही. जेव्हा जेव्हा हे गाणं लागतं तेव्हा तेव्हा माझी पृथा घरात कुठेही असो, धावतपळत टीव्हीसमोर येऊन अगदी डोळ्याची पापणीही न हलवता हे गाणं बघते. मधेच मला मिठी मारते, मला बिलगते आणि गाणं संपलं की परत कारभार करायला सुरुवात करते.

या गाण्याचा अर्थ मी तिला कधी सांगितला नाही, कधी तिला हे गाणं बघ म्हणून सांगितलं नाही. पण या अवघ्या १५ महिन्यांच्या मुलीला इतकं कळावं हे खरंच आमच्यासाठी आश्चर्य आहे.

मायची भावना आपसूकच येते हे आता मला पटवून देण्याची गरज नाही. पृथानेच पुरावा दिलाय मला. मी आपली रोज तिला म्हणत असते “I love you”. टीव्हीचा परिणाम थोडा आहेच माझ्यावर, पण तिला त्याची गरजच नाही कारण माझ्यापेक्षा जास्त मला ती समजते असं वाटायला लागलंय मला. आणि तसा विचार केला तर खरं पण आहे.

ती खूप शुद्ध आहे, बनावटी गोष्टींचा अजून तिला स्पर्श झालेला नाही. तिच्या भावनांचा पूर पूर्णपणे तिच्या आहेत, यात माणसाने माझ्यासाठी बनवलेल्या गोष्टींची भेसळ नाही. तिने कुठे हो हे जग बिघडलंय अजून. तिचं जग म्हणजे सगळं फक्त आई आणि बाबा.

संध्याकाळ झाली की बाबा बाबा करणं, ऑफिसमधून बाबा घरी आल्यावर पळत बाबा कडे जाऊन घट्ट मिठी मारणं हे तिला कधीच सांगितलं नाही. आणि हे सगळं तिला कसं कळतं हा आमच्यासमोरच प्रश्न आहे. असे तिचे वागणे बघून मन भारावून जातं.

कधी तिला ओरडलं, रागावलो तरी पुढच्या क्षणाला आई आई करत जवळ येते. वरून एक गोष्ट खरी आहे की जसे जसे आपण मोठे होतो आपली प्रेमाची भावना अवतीभवतीच्या वातावरणाने बदलत जाते. एका लहान बाळासारखे प्रेम आपण नाही करू शकत. आपल्याकडून अपेक्षा येतातच.

लहान मुलांचे असे निरागस वागणे खूप काही शिकवून जाते. न बोलता सुद्धा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करतो हे सांगणं किती सहज आणि सोपं आहे हे पृथाकडून शिकले.

जगातल्या बऱ्याच गोष्टी मी तिला रोजच शिकवतेय—हे असं असतं, ते असं असतं. थोड्याथोड्या वेळात तिच्या शुद्ध अंत:करणात भेसळ मिळवण्याचं काम करतेय. आणि ती मला निथळ गोष्टींची जाण करून देतेय. रोज तिच्याकडून काहीतरी नवीन शिकतेय.

खरं तर मी तिची आई आहे, पण ती म्हणजे मला गवसलेला सगळ्यात मोठा गुरु आहे.

Leave a Thought