शाळेचा उंबरठा (Shalecha umbartha)

शाळेच्या गेटमधून आत जाताना तिला टा-टा करत होते, डोळ्याची पापणी न लावता तिला गेटच्या पलीकडे अगदी दिसेनाशी होईपर्यंत बघत होते. डोळ्यांसमोर पहिल्यांदा माझ्याजवळ कपड्यांमध्ये गुंडाळून आलेली माझी लेक आज शाळेच्या गणवेशात खूप मोठी दिसायला लागली. अगदी हळुवारपणे एखादे पाखरू आपले पंख पहिल्यांदा पसरवताना चे डोळ्यांसमोर तरळून गेले, कौतुकाने मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते.
गेल्या दोन वर्षानंतर आता तुम्हा सगळ्यांनाच हा अनुभव आला असेल. शाळेच्या गेटजवळ घोळका करून उभ्या असलेल्या बऱ्याच चिंताजनक चेहऱ्यांवर एक गोष्ट जाणवत होती की ऑनलाइन बरं होतं, मुलं डोळ्यापुढे असायची. आता खूप काळजी वाटतेय. हा बदल अवघड आहे. लेकरं शाळेच्या उंबरठ्यावर असताना आईची घालमेल होणे स्वाभाविक आहे. पण यातही आनंद शोधायचा एक छोटासा प्रयत्न मी ही करतेय.
लेकीला शाळा किंवा शाळेत सोडणे तसे आम्हाला नवीन नाही, पण आता तिच्यातला बदल, तिच्यात आलेली गती आमच्यासाठी नवीन आहे. बऱ्याच गोष्टी तीला आईकडून करून घ्यायच्या आवडायच्या, आज ती काहीही कुरकुर न करता स्वतः करते. सहाजिकच एका आईसाठी तो खूप भावूक क्षण असतो. एकीकडे आनंद असतो आपलं पिल्लू स्वतंत्र झेप घेतंय, आणि दुसरीकडे एक वेगळीच भावना जी शब्दांत कधीच मांडता येणार नाही, फक्त अनुभव घेता येईल.
तीचा शाळेचा पहिला दिवस कसा गेला विचारल्यावर: “मला खूप कंटाळा आला, तुझी आठवण आली खूप.”
असे शब्द कानावर आले की परत तेच. तिच्यात अडकलेलं मन खुश होऊन जातं, एक आंतरिक समाधान की आई अजूनही खास आहे. पण तिचा आनंद न झेपल्याचेही वाईट वाटले. किती हे गोंधळात टाकणारे मातृत्व. अशाच संगतीमुळे नात्यांची वीण घट्ट होत जाते, आठवणी, किस्से तयार होतात. अगदी नकोसे झालेले क्षणसुद्धा आपण रंगवून सांगायला लागतो.
तिचं नवीन जग तयार होणार, बराच वेळ ती तिकडे रमणार, तिच्या शाळेच्या गमतीजमती ती कदाचित येऊन मला सांगेल. यातही एक वेगळीच उत्सुकता आहे. तिच्या गोड आवाजात तिचे परिणाम ऐकताना मीही माझ्या शालेय जीवनात परतेल तिच्या माध्यमातून. इतका सुरेख वर्तुळ हा निसर्गाचा जणू काही खूप विचारपूर्वक आखलेला आहे.
आईचं मन हे मुलांच्या मनाशी खूप भावना पूर्वक जोडलेलं असतं यात वादच नाही. पण एका आईच्या मनातल्या इच्छा खेळाबागड्यांच्या, मुलांच्या उत्साह बघूनच पूर्ण होतात. त्याची अनुभूती मला रोज मिळतेय.
तिच्यासोबत मनसोक्त आयुष्य जगायचं, वय विसरून अगदी उधाण मस्ती करायची मनातली सुप्त इच्छा भरभरून पूर्ण करून घेतेय. अगदी तिच्या जेवणाच्या डब्याची पॅकिंगपासून ते सुट्टीच्या दिवसाचा आराखडा तयार करण्यापर्यंत सगळ्यात मी सामील असते. हे शाळेचे, तिच्या मोठं होण्याचे अवस्थांतर, तिचं स्वतंत्रपणे काही गोष्टी करताना तिला बघून एक वेगळाच भरभरून आनंद मिळतो.