वास्तविकतेच्या पलीकडची वीण

छोट्याशा कृत्रिम तलावाच्या कठड्याला टेकून रेवती उभी होती. संध्याकाळ हळूहळू गडद होत होती. आभाळातून रिमझिम सरी बरसू लागल्या होत्या. पावसाचे असंख्य बारीक थेंब तलावाच्या पाण्याला अलगद स्पर्श करत त्यात विरून जात होते. प्रत्येक थेंबानंतर उठणारे तरंग जणू त्या नवागताचं हसत स्वागत करत होते.
रेवती त्या निसर्गसौंदर्यात हरवून गेली होती.
“किती सुंदर आहे ना हा हलकासा पाऊस?”
अचानक कानावर पडलेल्या आवाजाने रेवती दचकली.
तिने वळून पाहिलं.
उंच, देखणा, गोरा तरुण तिच्याकडे पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर सहज उमटलेलं हसू आणि डोळ्यांतील प्रसन्न चमक नकळत लक्ष वेधून घेत होती.
“मला पाऊस खूप आवडतो,” तो म्हणाला.
रेवती हलकंसं हसली.
“मला नाही आवडत विशेष. या पावसामुळे केसांचा सगळा गोंधळ होतो. मला तर सूर्य जास्त आवडतो.”
तो हसला.
“पावसाची गंमतच वेगळी असते.”
“कशी?”
“तो कधीच सहज भेटत नाही. आधी वाट पाहायला लावतो… मग ओढ निर्माण करतो… आणि अचानक एका दिवशी बरसतो. सगळं जग रंगवून जातो… आणि पुन्हा नाहीसा होतो. मागे फक्त त्याची आठवण ठेवून.”
क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली.
रेवती त्याच्याकडे पाहत राहिली.
“मग सूर्य?”
तिने नकळत विचारलं.
“सूर्य कायम असतो. त्याची सवय होते. पण पावसाची वाट पाहिली जाते.”
त्या उत्तराने रेवतीच्या मनात कुठेतरी हलकासा तरंग उठला.
“तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे इतक्या वेगळ्या नजरेने पाहता का?”
तो मंद हसला.
“इव्हेंट्सचं काम करतो. लोकांना कार्यक्रम दिसतो… मला त्यांच्या आठवणी दिसतात.”
त्या उत्तरावर रेवतीच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं.
“मी निघते.”
“हो… पुन्हा भेटू कदाचित.”
ती आपल्या खोलीकडे निघाली.
मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून दोन दिवसांची उसंत घेत ती आणि तिचा नवरा सुबोध त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये आले होते. सुबोधचा स्वभाव मुळात प्रेमळ होता; पण कामाच्या व्यापाने त्याला पूर्णपणे वेढून टाकलं होतं. ऑफिस, मिटिंग्ज आणि लॅपटॉप यापलीकडे त्याच्याकडे वेळच उरत नव्हता. निसर्ग किंवा इतक्या सखोल भावनांशी त्याचा संबंध उथळच
रेवती मात्र त्याच्या अगदी विरुद्ध होती. निसर्ग, पुस्तकं, संगीत आणि छोट्या-छोट्या क्षणांत आनंद शोधणारी. तिला प्रत्येक भावना मनापासून जगायला आवडायची.
याच रिसॉर्टमध्ये कंपनीच्या एका मोठ्या इव्हेंटच्या तयारीसाठी ध्रुवही आला होता.
ती आपल्या रूमचे दार उघडतच होती, की ध्रुव तिला परत दिसला. त्याची खोली शेजारचीच होती. तिला बघताच तो जरा बावचळला. की-पॅडवर कार्ड लावताना त्याची तारांबळ उडाली.
रेवतीच्या ओठांवर मिश्कील हास्य उमटलं.
तोही स्वतःवरच हसला.
“बहुतेक आज माझं आणि या कार्डचं काही जमत नाही.”
“बहुतेक पावसाचाच परिणाम असावा,” रेवती सहज म्हणाली.
दोघंही हलकेच हसले.
खोलीत शिरल्यावर मात्र तिच्या मनात त्याचाच विचार रेंगाळत राहिला.
“पावसाची वाट पाहिली जाते…”
रेवती दिसताच सुबोधने अगदी उत्साहाने तिला विचारलं,
“काय गं, कसा वाटला परिसर?”
रेवतीने त्याच्याकडे पाहिलं.
त्याला अजूनही लॅपटॉपवर चिकटलेला बघून तिने नाक मुरडलं.
“काय रे तू, अजूनसुद्धा कामच करतोय?”
“झालंच बघ, एक छोटीशी मिटिंग, आणि मग हा सुबोध फक्त तुझाच.”
तिला माहीत होतं…
सुबोधची ‘छोटीशी मिटिंग’ कधीच छोटी नसते.
ती अर्धा तास नव्हे, तर दोन-दोन तास चालते.
ती खिडकीत उभी राहिली.
बाहेर पाऊस अजूनही रिमझिम बरसत होता…
आणि नकळत तिच्या मनातही एखादा अनोळखी पाऊस सुरू झाला होता.
सुबोधची ती छोटीशी मिटिंग पुढचे दोन तास सुरूच होती. ती संपताच त्याने घड्याळाकडे पाहिलं. कसलीही क्षमा न मागता तो तिला घाईच्या स्वरात म्हणाला,
“अगं चल, तयार हो. संध्याकाळच्या गाण्याचा शो आहे. खालच्या हॉलमध्ये जाऊया, चल.”
टीव्हीचा रिमोट आदळत जराशी रुसलेली रेवती ताडकन उठली. बॅग चाचपडत मिळेल तो ड्रेस घालून ती तयारसुद्धा झाली. सुबोधने तिला जवळ घेतलं. तशी तिने नाराजी व्यक्त केली. त्याने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं आणि ते दोघे हॉलच्या दिशेने निघाले.
संध्याकाळी रिसॉर्टच्या प्रशस्त हॉलमध्ये सुरेल मैफलीची तयारी सुरू होती. मंद प्रकाश, सुगंधी मेणबत्त्या आणि खिडकीबाहेर कोसळणारा रिमझिम पाऊस… वातावरणात एक वेगळीच मोहिनी होती.
रेवती आणि सुबोध पुढे असलेल्या गोल टेबल वर जाऊन बसले .मंचावरचा गायक श्रोत्यांकडून गाण्यांच्या फर्माईशी मागत होता.
तेवढ्यात डाव्या बाजूने ध्रुव उठला. त्याने गायकाच्या कानात काहीतरी सांगितलं आणि आपल्या जागेवर येऊन बसला.
काही क्षणांनी गायकाचा आवाज दुमदुमला—
“ख्वाब हो तुम… या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ…”
पहिल्याच ओळीत रेवतीची नजर ध्रुवकडे वळली.
तो तिच्याकडेच पाहत होता.
त्याने हातातला ज्यूसचा ग्लास हलकेच उंचावला.
“चिअर्स…”
त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं.
रेवतीच्या गालांवर नकळत लाली पसरली. पण सुबोध बाजूलाच होता, तिने लगेच नजर दुसरीकडे वळवली.
छान रात्रीचं जेवण, थोडीशी वाईन घेऊन झालं होतं. दिवस जरी कंटाळवाणा गेला, तरी उर्वरित वेळ छान गेला होता. त्यामुळे रेवती थोडी खुश होती.
“पाच मिनिटांत आलो,” सुबोध म्हणाला, “एका क्लायंटचा फोन आहे.”
रेवतीने काही उत्तर दिलं नाही. तिला आता त्याच्या या वाक्याची सवय झाली होती.
तेवढ्यात तिकडून ध्रुव आला.
“हाय, आय ॲम ध्रुव.”
म्हणत त्याने संवाद सुरू केला. तिनेही काही विलंब न लावता,
“हाय, मी रेवती. मी मुंबईवरून आली आहे.”
म्हणून लगेच सांगितलं.
त्यानेही मुंबईचा उल्लेख ऐकला आणि सांगितलं की, “मी पण मुंबईवरूनच आहे.”
एवढंच बोलून तो निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी चेक-आऊटची लगबग सुरू होती.
सुबोध बिलाची औपचारिकता पूर्ण करत होता. रेवतीची नजर सहज रिसेप्शनवर ठेवलेल्या नोंदवहीवर गेली.
तिचं हृदय एकदम धडधडलं.
ध्रुव जोशी. नावाखाली मोबाईल क्रमांकही लिहिला होता.
तिने आजूबाजूला पाहिलं.सुबोध अजूनही रिसेप्शनिस्टशी बोलण्यात गुंतला होता.क्षणाचाही विचार न करता तिने मोबाईलमध्ये तो नंबर टिपून घेतला.
गाडीत बसल्यानंतर मात्र तिच्या मनात अपराधीपणाची हलकीशी टोचणी लागली.“हे करायला नको होतं…”पण तरीही तिने तो नंबर डिलीट केला नाही.
मुंबईत परतल्यावर दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाले.सुबोध ऑफिसमध्ये व्यस्त.रेवती घर, वाचन आणि तिच्या लेखनात.पण अधूनमधून पाऊस पडला की तिला त्या
रिसॉर्टमधला तलाव आठवायचा… आणि त्याचं ते वाक्य…
“पावसाची वाट पाहिली जाते…”
एक आठवडा तिने स्वतःला खूप रोखून धरलं.शेवटी एका पावसाळी संध्याकाळी तिने मोबाईल हातात घेतला.बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली.
आणि फक्त एकच संदेश पाठवला.“हॅलो… ओळखलंत?”
मेसेज पाठवल्यानंतर तिच्या छातीत धडधड सुरू झाली.
“का पाठवला मी?”ती तो डिलीट करणार इतक्यात मोबाईल उजळला.
“रेवती…? रिसॉर्ट… पाऊस… कसं विसरेन?”
तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं.त्या दिवसापासून संवाद सुरू झाला.सुरुवातीला हवापाण्याच्या गप्पा…मग काम…
नंतर पुस्तकं…
गाणी…आणि नकळत एकमेकांचा दिवस.
“आज दिवसभर खूप दमलो.”
“जेवलास?”
“नाही अजून.”
“मग आधी जेव.”
“तू सांगितलंस म्हणून.”इतकंसं वाक्यही रेवतीला दिवसभर पुरून उरायचं.ध्रुवलाही तिच्याशी बोलल्याशिवाय दिवस अपुरा वाटू लागला.
एकेदिवशी त्याने मेसेज केला—
“आज पाऊस पडतोय.”
रेवतीने उत्तर दिलं—
“मग कोणाची आठवण काढतोयस?”
क्षणभर ‘टायपिंग…’ दिसत राहिलं.
मग उत्तर आलं—
“जिच्याशी पावसाबद्दल पहिल्यांदा बोललो होतो तिची.”तो संदेश वाचून रेवती बराच वेळ नुसतीच हसत बसली.
तिला कळत होतं…हे नातं आता केवळ ओळखीपुरतं राहिलेलं नव्हतं.आणि त्याच क्षणी तिला स्वतःचीही भीती वाटली.दिवस सरत गेले.
मेसेजचं रूपांतर फोन कॉलमध्ये झालं.फोन कॉलचं रूपांतर शांततेतही एकमेकांना समजून घेण्यात झालं.
कधी रेवती तिची अपूर्ण कथा त्याला ऐकवायची, तर ध्रुव त्याच्या इव्हेंट्समधले गंमतीदार किस्से सांगायचा.
“तुला माहिती आहे?” एकदा तो म्हणाला, “तुझ्याशी बोललो की दिवसभराचा थकवा कुठे विरघळून जातो, कळतच नाही.”
रेवती काही क्षण शांत राहिली.
“मग बोलू नकोस…”
“का?”
“कारण ही सवय झाली तर…?”
ध्रुवने उत्तर दिलं नाही.
दोघांनाही त्या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं.
ध्रुवमधला बदल ईशाच्या नजरेतून सुटला नाही.
पूर्वी सतत कामात गुरफटलेला असणारा ध्रुव आता कधी नकळत गुणगुणायचा, कधी मोबाईलकडे पाहून हसायचा.एकदा तर आरशात स्वतःचे केस नीट करताना तो शिट्टी वाजवत होता.
ईशा दारात उभी राहून त्याच्याकडे पाहत होती.“आजकाल खूप आनंदात दिसतोयस.”
ध्रुवने सहज हसून विषय बदलला.पण ईशाच्या मनात संशयाचं पहिलं बी पडलं होतं.इकडे सुबोध त्याच्या कंपनीच्या वार्षिक आंतरराष्ट्रीय इव्हेंटच्या तयारीत पूर्णपणे बुडाला होता.
मोठमोठ्या परदेशी पाहुण्यांचं नियोजन, सादरीकरणं, व्यवस्था…घरी येऊनही त्याच्या हातातून लॅपटॉप सुटत नव्हता.
“ऐक ना…”
रेवतीने एका रात्री हळूच विचारलं.
“हं?”
“आपण शेवटचं निवांत कधी बोललो होतो?”
सुबोधने स्क्रीनवरून नजरही न हटवता उत्तर दिलं,
“हा इव्हेंट होऊ दे. मग पूर्ण वेळ तुझाच.”
रेवतीने हसण्याचा प्रयत्न केला.हे वाक्य ती किती वेळा ऐकत होती, तिलाच आठवत नव्हतं.योगायोग असा की त्या इव्हेंटचं व्यवस्थापन ध्रुवच्या कंपनीकडे होतं.
कामाच्या व्यापामुळे ध्रुवचे फोन कमी झाले.मेसेजही कमी झाले.रेवती अधूनमधून मोबाईल हातात घ्यायची.स्क्रीन उजळायची…
पण त्याचा मेसेज नसायचा. तिलाही राहवेना, पण तडक जाऊन त्याला भेटणं शक्य नव्हतं.
एकदा तिनेच फोन केला.
“सॉरी…”
ध्रुवचा दमलेला आवाज आला.
“खूप काम आहे.”
“माहितीय.”
“रागावलीस?”
“नाही.”
दोघेही काही क्षण शांत राहिले.
“इव्हेंट संपला की भेटूया?”
ध्रुवने हळूच विचारलं.
रेवतीच्या ओठांवर हसू उमटलं.
“नक्की.”तो शब्द उच्चारताना तिच्या मनात किती आनंद होता, हे तिच्याच लक्षात आलं नाही.
अखेर इव्हेंटचा दिवस उजाडला.सुबोधने सकाळीच उत्साहाने सांगितलं,
“आज संध्याकाळी माझ्यासोबत यायचं आहे.”
“मी?”
“हो. सहकुटुंब निमंत्रण आहे.”
रेवतीने सहज मान हलवली.तिला माहीतच नव्हतं…आजचा इव्हेंट ध्रुवच आयोजित करत होता.तिकडे सकाळपासून ध्रुवची अक्षरशः धावपळ सुरू होती.
विदेशी पाहुणे, मेन्यू, स्टेज, सादरीकरणं…सगळ्यांवर त्याची नजर होती.त्या गडबडीत तो मोबाईल घरीच विसरला.व्हेन्यूवर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आलं.
त्याने लगेच एका सहकाऱ्याचा फोन घेतला.
“ईशा… प्लीज, माझा मोबाईल घेऊन व्हेन्यूवर ये.”
“ठीक आहे.”
ती एवढंच म्हणाली.
तो पार विसरला होता की त्याचं एक वेगळं विश्व त्या मोबाईलमध्ये वावरत आहे.मोबाईल उचलताना तिची नजर स्क्रीनवर गेली.
तेवढ्यात स्क्रीन उजळली.
रेवती…
आणि खाली मेसेज…
“Miss You…”
ईशाच्या हातातला मोबाईल थरथरला.क्षणभर तिचा श्वास अडकला.तिने पुन्हा एकदा स्क्रीनकडे पाहिलं.मेसेज तसाच होता.आता तिच्या मनातल्या प्रत्येक शंकेला उत्तर मिळालं होतं.एक शब्दही न बोलता तिने गाडीची किल्ली उचलली…आणि इव्हेंटच्या दिशेने निघाली.
इव्हेंटला सुरुवात व्हायला अजून थोडा वेळ होता.
सुबोधने रेवतीला रिसेप्शनबाहेरच्या प्रशस्त पटांगणात थांबायला सांगितलं.
“मी पाहुण्यांना भेटून लगेच येतो.”
तो कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने निघून गेला.रेवती शांतपणे आजूबाजूचा परिसर न्याहाळत उभी होती.अचानक तिची नजर वरच्या मजल्यावर गेली…आणि तिचा श्वास क्षणभर थांबला.
ध्रुव!
तो जिन्याजवळ उभा होता.कित्येक दिवसांनी…अगदी समोर.ध्रुवचीही नजर तिच्यावर पडली.त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी उमटला.
त्याने हाताने हलकासा इशारा केला…
जणू, "थांब…" असं काहीतरी सांगत होता.पण रेवतीला आता काहीच दिसत नव्हतं.कित्येक दिवसांची ओढ एका क्षणात तिच्या पावलांत उतरली. जिन्याकडे धावत सुटली.
त्याच वेळी…मुख्य प्रवेशद्वारातून ईशा आत आली.तिच्या हातात ध्रुवचा मोबाईल होता.तिने वर पाहिलं…रेवती ध्रुवकडे धावत होती.क्षणभर तिचे डोळे विस्फारले.
कॉन्फरन्स हॉलच्या काचेआडून सुबोधची नजरही त्या दिशेने गेली.रेवतीची ती घाई…तो अनोळखी पुरुष…क्षणाचाही विचार न करता त्याने पाहुण्यांची माफी मागितली आणि बाहेर धाव घेतली.रेवती आता ध्रुवपासून अवघ्या काही पावलांवर होती.ध्रुव पुन्हा हाताने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता.त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता…
काळजी होती.पण रेवतीला त्याचा अर्थ कळेना.तिला फक्त एवढंच वाटत होतं…एकदा…फक्त एकदा त्याला मिठी मारावी.तिने पुढे पाऊल टाकलं…
आणि—
…
“रेवती…”
दूर कुठेतरी कोणीतरी हाक मारली.
ती थांबली.
पुन्हा आवाज आला.
“रेवती… ऐकतेयस ना?”
ध्रुवचा चेहरा धूसर व्हायला लागला.
पाऊस विरायला लागला.
रिसॉर्ट… लोक… आवाज…
सगळंच धुक्यात विरघळू लागलं.
“रेवती!”
यावेळी आवाज अगदी जवळून आला.तिने डोळे उघडले.समोर शुभ्र छत होतं.बाजूला डॉक्टर उभे होते.हातात तपासणीचा अहवाल.आणि तिचा हात घट्ट धरून उभा होता…
श्री.
ती त्याच्याकडे अनोळखी नजरेने पाहत राहिली.बराच वेळ तिला काहीच समजेना.
ध्रुव कुठे गेला?
रिसॉर्ट?
पाऊस?
सुबोध?
ईशा?
हे सगळं…
नेमकं काय होतं?
तिच्या मनात हा निराळाच गोंधळ सुरू असताना,डॉक्टर शांतपणे म्हणाले,
“आता काळजीचं काही कारण नाही. थोड्या वेळात तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता.”
डॉक्टर बाहेर गेले.श्री तिच्याजवळ बसला.
“किती घाबरलो होतो मी.”
त्याच्या डोळ्यांत खरंच काळजी होती.
“तयार होताना अचानक तुला चक्कर आली… आणि तू बेशुद्ध झालीस. तेव्हापासून सारखी काहीतरी पुटपुटत होतीस.”
रेवती अजूनही गोंधळलेली होती.
हळूहळू आठवणी परत यायला लागल्या.
हो…
ती रेवती…
एक लेखिका.
श्री… तिचा होणारा नवरा. श्री तिच्यापेक्षा तिेच्या लिखाणाच्या प्रेमात जास्त होता.
आज तिच्या पहिल्या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाचा दिवस.समारंभाला निघण्यापूर्वीच ती बेशुद्ध पडली होती.आणि त्या काही क्षणांच्या बेशुद्धीत…
जणू ती एक दुसरं आयुष्य, अगदी वास्तविकतेइतकंच खरं; पण त्या पलीकडचं, जगून आली होती. श्रीने हसत तिचा हात हातात घेतला.
“चल?”ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली.
“आजचा दिवस विसरलीस वाटतं?”
तो उठला.टेबलवर ठेवलेलं एक पुस्तक तिच्या हातात दिलं.
“सगळे तुझी वाट पाहतायत.”क्षणभर थांबून तो मिश्कीलपणे म्हणाला,
“आणि… ध्रुवसुद्धा.”रेवती दचकली.
श्री हसला.
“अगं… तुझ्या कादंबरीतला नायक.” तिने थरथरत्या हातांनी पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं.
त्यावर ठळक अक्षरांत शीर्षक झळकत होतं—"वास्तविकतेच्या पलीकडची वीण."
तिच्या ओठांवर मंद हसू उमटलं.मुखपृष्ठावरून अलगद हात फिरवत ती खिडकीबाहेर पाहू लागली.बाहेर पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला होता.क्षणभर तिला वाटलं…
कुठेतरी… शब्दांच्या, स्वप्नांच्या आणि वास्तविकतेच्या पलीकडे,
ध्रुव अजूनही तिची वाट पाहत उभा आहे.